बुलडाणाविषयी

बुलडाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे. शेगांव येथील आनंदसागर बागेचे प्रवेशद्वार विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलडाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.

इतिहास

या जिल्ह्याविषयीचा सुसंगत असा प्राचीन इतिहास फारसा आढळत नाही. येथील लोणार सरोवर व मेहेकर या ठिकाणांविषयी पुराणांतून उल्लेख आढळतात. सत्ययुगात लोणार सरोवर ‘बैरज तीर्थ‘ या नावाने ओळखले जात असे. मेहेकर गावाविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. या परिसरात मध्ययुगीन मंदिरांचे अवशेषही आढळतात. प्राचीन कुंतल देशात हा प्रदेश समाविष्ट होता. काही ऐतिहासिक निर्देशांकानुसार हा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात होता त्यानंतर या प्रदेशावर सातवाहनांचे साम्राज्य आले. जिल्ह्यातील रोहनखेड येथे १४३७ मध्ये अलाउद्दीन शाह (बहमनी दुसरा) याचा सेनापती व खानदेशचा सुलतान यांच्यात आणि १५९० मध्ये बुऱ्हाण निजामशाह व जमालखान (माहदवी) यांच्यात लढाया झाल्या. १७२४ मध्ये साखरखेर्डा येथे निजामुल्मुल्क आसफजाह (हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक) व मोगल सरदार मुबारीझखान यांच्यात लढाई होऊन आसफजाहास जय मिळाला. दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धापूर्वी १८०३ मध्ये दौलतराव शिंदे व रघुजी भोसले यांचा या जिल्ह्यातील मलकापूर येथे तळ होता, असा उल्लेख आढळतो. १८५३ मध्ये बुलडाणा हा प. बेरार विभागाचा एक भाग म्हणून जाहीर करण्यात आला. १८६४ मध्ये याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली व १८६७मध्ये बुलढाण शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण झाले.

हवामान

बुलढाणा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे असून आरोग्यदायी आहे. स्थलपरत्वे मात्र हवामानात थोडाफार फरक आढळून येतो. उन्हाळ्यात (मार्च ते मे) उत्तरेकडील ‘पयानघाट‘ या सखल प्रदेशात दक्षिण भागापेक्षा तपमान जास्त असते. मे हा सर्वात जास्त तपमानाचा महिना असून या महिन्यात दक्षिण भागाचे तपमान २६,२° से. पर्यंत असते तर उत्तर भागात २७.४° से. ते ४२.३° से. पर्यंत असते. काही वेळा ते ४७° से. पर्यंतही जाते. हिवाळ्यातील डिसेंबर महिना कडक थंडीचा असून या काळात दक्षिण भागाचे तपमान १५.१° से. ते २७.६° से. पर्यंत असते. तर उत्तर भागात ते ३° से. पर्यंत खाली येते. तपमानाप्रमाणेच पर्जन्यमानातही स्थलपरत्वे फरक आढळतो. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९.६ सेंमी पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमीकमी होत जाते. जिल्ह्याच्या वायव्य भागात (बुलढाणा व धामणगाव बढे भागांत) इतर भागांपेक्षा पावसाचे प्रमाण तास्त असते. जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के पाऊस पडतो. मान्सूननंतरच्या काळात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वादळांचा येथील हवामानावर थोडाफार परिणाम होतो. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ११ टक्के म्हणजे १,५६,००० हे. क्षेत्र १९७८ साली जंगलांखाली होते. यापैकी ४०,८०० हे. क्षेत्र महसूल खात्याकडे व १,१५,२००हे. क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात होते. जिल्ह्यात प्रामुख्याने बालाघाट पठारावरील अजिंठा डोंगररांगांत व पूर्णा नदीखोऱ्यात जंगले आढळतात. या जंगलात पानझडी वृक्षांचे प्रमाण जास्त असून त्यात साग, अंजन, बाभूळ, सालई, निंब, हिवर तसेच आंबा, चिंच, बोर, पिंपळ, शिंदी, तिवस, करंज इ. वृक्षप्रकार आढळतात. जळगाव भागातील ‘अंबाबरवा‘, मेहेकर तालुक्यातील ‘घाटबोरी‘, चिखली तालुक्यातील ‘गुम्मी‘ व खामगाव तालुक्यातील ‘गेरूमाटरगाव‘ इ. जंगले प्रसिद्ध आहेत. गेरूमाटरगाव जंगलात चंदनाची झाडे आहेत. डोंगरउतारांवर व दऱ्यांमध्ये बांबूची वने असून अंबाबरवा राखीव जंगलात बांबूची लागवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील जंगलांतून बिबळ्या, रानबोका, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर इ. हिंस्त्र प्राणी तसेच सांबर, नीलगाय, चितळ, अस्वल हेही आढळतात. वाघ मात्र क्वचितच दिसतो. काळ्या तोंडाची वानरे, विषारी, बिनविषारी सर्प सर्वत्र दिसतात. मोर, ससाणा, कोकीळ, निळी व पांढरी कबुतरे, तितर, लावा इ. पक्षी सर्वत्र आढळतात.

अर्थकारण

या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा शेती हाच मुख्य आधार असून या व्यवसायात जिल्ह्यातील एकूण कामकऱ्यांपैकी ८५% (५,३०,०००) लोक गुंतलेले होते (१९७८). १९७६-७७ साली जिल्ह्यात एकूण ७,५०,००० हे. लागवडयोग्य क्षेत्र उपलब्ध होते व त्यापैकी सु. ७,२१,००० हे. क्षेत्रात लागवड करण्यात आली होती. अन्नधान्य पिकांखालील क्षेत्राचे प्रमाण जास्त असून १९७६-७७ साली या पिकांखाली ४,५७,००० हे. (६२.४८%) क्षेत्र होते. जिल्ह्यात कापूस व ज्वारी या दोन प्रमुख पिकांशिवाय गहू, तांदूळ, बाजरी, कडधान्ये, भुईमूग, मका, ऊस इ. पिकेही घेतली जातात. जिल्ह्यातील बहुतेक शेती पावसावरच अवलंबून असल्याने, जास्त उत्पन्नाच्या दृष्टीने संकरित ज्वारीसारखी पिके अन्नधान्य म्हणून तर कापूस, भुईमूग, ऊस ही नगदी पिके म्हणून घेतली जातात. १९७७-७८ साली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे उत्पादन होते (आकडे मे. टन) : ज्वारी ४,२३,४०० गहू ४२,८०० तांदूळ ४,८०० बाजरी ३,७०० हरभरा २,८०० तूर २४,००० उडीद १०,२०० मूग ६,००० इतर कडधान्ये ७,००० भुईमुग १२,००० व मका १२००. या वर्षी जिल्ह्यातून ऊस ९,९०० मे. टन कापूस १,२४,६०० गाठी (१गाठ = १८० किग्रॅ.) अंबाडी ७०० मे. टन लाल मिरची १,३०० मे. टन. असे उत्पादन घेण्यात आले. ज्वारी व कापूस जिल्ह्यात सर्वत्र होतो. गहू, हरभरा, करडई ही पिके मेहेकर व चिखली तालुक्यांत जास्त होतात. या पिकांशिवाय विड्याची पाने (विशेषतः जळगाव, चिखली तालुक्यात), केळी, संत्री, मोसंबी, द्राक्षे इ. बागायती पिकेही या जिल्ह्यात घेतली जातात. जिल्ह्यात कापूस हे महत्वाचे पिक असल्याने, त्यावर आधारीत अनेक उद्योगधंदे चालतात. सरकी काढणे, कापसाच्या गाठी बांधण्याचे कारखाने (सु.५७ – १९७९) चिखली, मलकापूर, नांदुरा, जळगाव, शेगाव, खामगाव, मेहेकर, लोणार इ. ठिकाणी आहेत. यांशिवाय जिल्ह्यात हातमाग (देऊळगाव राजा, नांदुरा), घोंगड्या बनविणे (सिंदखेड राजा), चामडी कमविणे, अडकित्ते तयार करणे (देऊळघाट), तेलघाण्या इ. लहानमोठे उद्योग चालतात. मेहेकर तालुक्यातील दुसरबीड येथे जिजामाता सहकारी साखर कारखाना असून त्यात एकूण ५०० कामगार काम करतात. १९७८-७९ साली या कारखान्यात १.३० लक्ष क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. जिल्ह्यात १९७८साली अधिकृत नोंदणी केलेले लहानमोठे असे ६१ कारखाने होते. यांत अन्नप्रक्रिया, कापड, कागद व कागद उत्पादने, लहान यंत्रसामग्री व दुरूस्ती इत्यादींच्या कारखान्यांचा समावेश होता. यांशिवाय जिल्ह्यात पशुपालन व दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मासेमारी, जंगल उत्पादन इ. अन्य व्यवसाय चालतात.

१९७८ साली जिल्ह्यात एकूण गाई-बैल ४,८७,००० म्हशी ७१,००० शेळ्या – मेंढ्या २,१४,००० कोंबड्या १,२०,००० व इतर प्राणी १०,००० असे प्शुधन होते. त्याच वर्षी जिल्ह्यात गुरांचे २० दवाखाने होते. जिल्ह्यात १९७८ साली ६ मुख्य सहकारी दुग्धसंस्था व तीन शीतगृहे होती. कोंबड्यांचे खाद्य तयार करणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना निमगाव येथे आहे.पावसाचे कमी प्रमाण व अनियमितपणा यांमुळे जिल्ह्यात अनेक मध्यम प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात १९८०-८१ साली एकूण ४०,३६४ हे. क्षेत्र सिंचनक्षम होते. नळगंगा व ज्ञानगंगा, पलढग व मांडवा या प्रकल्पांची पूर्तता झाली असून त्याद्वारा शेतीस पाणी पुरवठा केला जातो. यांशिवाय कोराडीनाला, मासनदी इ. योजना १९८१ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट होते. मुंबई – नागपुर – हावडा हा रेल्वेचा रूंदमापी लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. या जिल्ह्यात लोहमार्गाची एकूण लांबी ८२किमी आहे. मलकापूर हे जिल्ह्यातील महत्वाचे लोहमार्ग स्थानक असून त्याशिवाय नांदुरा, जलंब (प्रस्थानक), शेगांव ही अन्य स्थानके आहेत. जलंब पासून दक्षिणेस खामगांवपर्यंत या लोहमार्गाचा एक फाटा जातो. जिल्ह्यात १९७९ साली एकूण ३३३५ किमी लांबीचे रस्ते होते. मुंबई – नागपुर – कलकत्ता हा सहा क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून जातो. याची जिल्ह्यातील लांबी ७६.६० किमी आहे. यांशिवाय जिल्ह्यात सात राज्यमार्ग असून त्याची एकूण लांबी ४९१.६५ किमी होती. याच वर्षी जिल्ह्यात सिमेंटचे ३.८० किमी लांबीचे आणि ३,३३१.२९ किमी. लांबीचे डांबरी व कच्चे रस्ते होते. जिल्ह्यात एकूण ४,०५७ वाहने, २९९ डाक घरे व ४५ तार घरे तसेच १,४३४ दुरध्वनी व १९,४५५रेडिओ संच होते.

लोक व समाजजीवन

१९८१ साली जिल्ह्यात एकूण नऊ शहरे व १,३९७ खेडी होती. ण्कूण लोकसंख्येपैकी १२,२७,९७५ लोक खेड्यांत तर २,७८,९८१ लोक शहरांत रहात होते. जिल्ह्यातील लोकसंख्येपैकी बव्हंशी लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. १९७८ साली शेतकामात एकूण ५,३०,००० मजूर काम करीत होते. जिल्ह्यात १९७१ च्या जनगणनेप्रमाणे एकूण १,५५,००० बौद्ध २,३०० ख्रिस्ती ९,५८,२०० हिंदू १०,३०० जैन १,३४,८०० मुस्लिम २,१०० शीख व २००इतर धर्मीय होते. त्याच वर्षी जिल्ह्यात अनुसूचित जातीजमातीचे एकूण ६८,००० लोक होते. जिल्ह्यातील जंगल व्याप्त व डोंगराळ भागात अदिवासी लोक राहतात. येथील आदिवासींत ⇨ बंजारा, ⇨कोरकू, ⇨पारधी, नीहाल इ. प्रमुख जमाती आहेत. ह्या जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात कोरकू व नीहाल आणि मेहेकर व चिखली तालुक्यात बंजारा जमातीची वसती आढळते. येथील लोकांच्या पेहेरावात महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच आधुनिकता आलेली दिसून येते. मात्र खेडेगावांमध्ये धोतर अथवा पायजमा, सदरा असा पुरुषांचा, तर स्त्रियांचा नऊवारी साडी व चोळी असा पोषाख असतो.
जिल्ह्यात बहुतेक सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फिरते दवाखाने तसेच क्षयरोगी व कुष्ठरोगी यांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. १९७८ साली जिल्ह्यात एकूण १३ रुग्णालये व ९६ दवाखाने होते. यांशिवाय त्याच वर्षी जिल्ह्यात एकूण १३ प्रथमोपचार केंद्रे, २ प्रसूतिगृहे, १४१ डॉक्टर व वैद्य आणि २३४ परिचारिका, तसेच एकूण ६६५ खाटांची सोय होती. बुलडाणा येथे क्षयरोग्यांसाठी व खामगाव येथे कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालये काढण्यात आली आहेत. त्याशिवाय मलेरिया निर्मुलनाचे कार्यही हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात १९७१च्या जनगणनेप्रमाणे एकूण ४,७२,००० लोक (३७.३४%) साक्षर होते. खेड्यांपेक्षा (३३.९६%) साक्षरतेचे प्रमाण शहरांत (५३.२०%) जास्त आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत.१९७९ साली जिल्ह्यात एकूण १,३२० प्राथमिक शाळात १,८१,००० विद्यार्थी आणि ५,००० शिक्षक १५१ माध्यमिक शाळांत ६१,००० विद्यार्थी व २,००० शिक्षक आणि१० उच्च शिक्षणसंस्थात ४,००० विद्यार्थी होते. खामगांव येथे तंत्रनिकेतन व चिखली येथे विज्ञान महाविद्यालय आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या व मागासवर्गिय विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त शिक्षण सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अनेक सहकारी सेस्था असून सहकारी वीज उत्पादन केंद्र आणि सहकारी औद्योगिक केंद्रही आहे. याशिवाय अनेक चित्रपटगृहे, नाट्यगृहे, फिरती तमाशा मंडळे यांसारख्या मनोरंजनाच्या सोयी जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या जिल्ह्यात १९७९ साली एकून ७९४ ग्रामपंचायती, ९ नगापालीका व ९६ बॅंकशाखा तसेच १,१६२ सहकारी संस्था होत्या. याच वर्षी जिल्ह्यात मराठीतून एक दैनिक, १५ साप्ताहिके (पैकी३ हिंदी), १ अर्धसाप्ताहिक (ज्ञानगंगा-शेगावहून),१ पाक्षिक व १ मासिक प्रसिद्ध होत होते. यशवंत संदेश, आव्हान (मलकापूर) शेतकरी, बुलडाणा पत्रिका (बुलडाणा) निनाद (खामगांव) शिवसंदेश (मेहेकर) ही साप्ताहिके, तर समाजक्रांती (शेगांव) हे पाक्षिक प्रसिद्ध होत होते. दहा दोन तीन (नांदूरा) हे शैक्षणिक पाक्षिक १९८१ पासून सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे माहिती

  • शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
  • लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
  • जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
  • नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
  • देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
  • लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे.
  • लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलडाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव आहे.
  • मोताळा तालुक्यातील तारापूर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
  • देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.
  • सुलतानपूर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
  • उंद्री या गावापासून ... कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
  • अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा रोडवर आहे.
  • आराध्यदैवत हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा दर्गा हे देवस्थान पिंपळगांव येथे हिंदू व मुस्लिम धार्मिक स्थळ ता.चिखली जिल्हा बुलडाणा आहे. सैलानी बाबाच्या मार्च महिन्यातील ऐतिहासिक (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतून तसेच दक्षिण मराठवाडा (लातूर, उस्मानाबाद व नांदेड), विदर्भ (बुलडाणा,अकोला, वाशीम, यवतमाळ व चंद्रपूर) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने हिंदू धर्मीय व मुस्लिमधर्मीय लोक भाविक उपस्थित राहतात.

क्रीडा संकुल